कोरोना नियमावलीचे उल्लंघन; 13 दुकानांना सील ठोकले!
- मास्क न लावणार्यांना 32 हजाराचा दंड
- लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
नांदेड,ः शहरातील व्यापार्यांनी विरोध केल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने लांबणीवर टाकला आहे. परंतु, आता कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्वतः जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त व इतर प्रमुख अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येते. दरम्यान , कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणार्या 13 दुकानांना बुधवारी मनपाच्या पथकाने सील ठोकले. तसेच तोंडावर मास्क न लावणार्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी 32 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
नऊ तारखेपासून लॉकडाऊन लागू करण्याचा प्रशासनाचा विचार होता. परंतु, शहरातील व्यापार्यांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन लॉकडाऊन लागू करू नये, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी तुर्त लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. परंतु, 5 दिवस सध्याच्या परिस्थितीत कोरोना नियमावलीचे सर्वांनी कडक पालन करावे, तसे न झाल्यास लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यापार्यांच्या बैठकीत स्पष्ट केले होते.
त्यानुसार मंगळवारपासून शहर व परिसरात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाईसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी तसेच पोलीस विभाग, मनपा, परिवहन विभाग व इतर विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह इतर प्रमुख अधिकार्यांनी मंगळवारी व बुधवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच बाजारपेठांमध्ये जाऊन पाहणी केली.
दरम्यान, महानगरपालिकेच्या पथकाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी (दि.8) शहरातील चिखलवाडी कॉर्नर, जुना मोंढा या भागात तपासणी केली. सोशल डिस्टसिंगचे पालन न करणार्या 13 दुकानांना या वेळी सील ठोकण्यात आले. या कारवाईत मनपाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार, सुधीर इंगोले, विलास भोसीकर, सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा फरतुल्ला बेग, अविनाश आटकोरे, अग्नीशमन अधिकारी रईस पाशा व इतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला. ज्या 13 दुकानांना सील ठोकण्यात आले त्या दुकानांची नावे अशी ः सागर मोबाईल, वजिराबाद, विनायक टेलिकॉम, हरिओम मोबाईल, मारोती मोबाईल सर्व चिखलवाडी कॉर्नर, श्री ट्रेडर्स, इलियास ट्रेडिंग कंपनी, पाडुंरंग ट्रेडिंग कंपनी, रहेमान ट्रेडिंग कंपनी, कोमल ट्रेडिंग कंपनी सर्व जुना मोंढा, बॉम्बे वॉच डेपो, हनुमान टेकडी, बॉम्बे लेडीज कलेक्शन, वजिराबाद, रिलायन्स डिजीटल मार्ट, मनियार हॉटेल, शिवाजीनगर.
मास्क न वापरणार्यांना 32 हजाराचा दंड
तोंडाला मास्क न लावल्यामुळे तरोडा, सांगवी परिसरातील पथकाने 54 जणांकडून 7 हजार 400, अशोकनगर पथकाने 35 जणांकडून 5 हजार शंभर रूपये, शिवाजीनगर पथकाने 55 जणांकडून 5 हजार 500 रूपये, सिडको पथकाने 107 जणांकडून 13 हजार 900 असा एकूण 251 व्यक्तींकडून 31 हजार 900 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे मनपाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.



No comments